संदीप पंजाबराव भगत, तुषार आत्माराम कुंभारे व पंचशील ज्ञानदेव शिंदे (सर्व रा. पुणे) असे अटक केेलेल्या आरोपींचे नावे आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती. यामुळे आता अटक आरोपींची संख्या सात झाली आहे. अटक केलेल्या सात जणांना तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्वांना २८ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या संस्था, सरकारी एजन्सी यांच्या नावाने बनावट शिक्के तसेच बनावट व खोटे चेक तयार करून त्यावर खोट्या सह्या करत ते बँकेत वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. येथील स्टेट बँकेत तब्बल अडीच कोटींचा बनावट चेक वटविण्यासाठी आले असतानाच तिघांना पोलिसांनी अटक केली. या बनावट चेक प्रकरणात देशभरात मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सुरूवातीला विपुल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर, राहुल गुळवे या चौघांना अटक केली होती. यानंतर शनिवारी पहाटे अजून तिघांना अटक केली. दिल्ली येथील एक आरोपी पसार आहे.
दिल्ली म्युनिसिपल कौन्सिलच्या नावे अडीच कोटी रूपयांचा एक बनावट चेक विपुल वक्कानी, यशवंत देसाई, नरेश बालकोंडेकर हे घेऊन सावेडीतील स्टेट बँकेच्या शाखेत आले. त्यांनी बँकेत चेक वटविण्यासाठी दिला. या चेक बाबत शाखेतील मॅनेजरला शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर हा बनावट चेकचा प्रकार समोर आला.