अहमदनगर : सोमवारचा दिवस निरंक गेल्यानंतर मंगळवारी दोन नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामध्ये एक शेवगाव येथील असून दुसरा नगर येथील आहे.मुंबई येथून भावी निमगाव येथे आलेला ४१ वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. तसेच कुर्ला येथून बोल्हेगाव फाटा येथे आलेल्या ४१ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती कुर्ला येथे चालक म्हणून काम करीत होती. राहाता येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.जिल्ह्यात सोमवारी एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याने एक मोठा दिलासा मिळाला होता. बरे होणाºयांचे प्रमाण ८० टक्के झाले आहे. मात्र मंगळवारी पुन्हा दोन जण आढळून आले आहेत. दरम्यान मंगळवारी सकाळी सात जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामध्ये संगमनेर शहरातील चार, राहाता शहरातील दोन आणि नगर शहरातील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या २१३ झाली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये मंगळवारी ६२ जणांच्या घशातील स्त्रावांची तपासणी केली होती. त्यामध्ये ३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. उर्वरीत ३१ पैकी दोन जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.