नगर : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी आग लागून ११ कोरोना रुग्णांचा बळी गेल्याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांना अटक केली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. अग्निकांडप्रकरणी लोकमतने प्रशासनाच्या बेजबाबदार वर्तनाविरोधात सवाल उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.
वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना अनंत यांना अटक करण्यात आली आहे. शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आले आहे, तर शेख आणि अनंत यांची सेवा समाप्त करण्याचा आदेश काढला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या निलंबनासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली.
घटनेच्या दिवशीच अज्ञात आरोपींविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेची तीव्रता लक्षात घेता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जळालेल्या कक्षाची संपूर्ण पाहणी केली होती.
परिचारिकांची निदर्शने
निलंबित तीन परिचारिकांवरील कारवाई त्वरित मागे घ्यावी, अन्यथा सर्वांचे निलंबन करावे, अशी मागणी करत मंगळवारी सकाळी परिचारिकांनी जिल्हा रुग्णालयासमोर निदर्शने केली. राज्यातही काही ठिकाणी परिचारिकांनी निदर्शने केली. परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे परिचारिकांच्या संघटनेने निषेध नोंदविला आहे. प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याची मागणीही पुढे येत आहे.
‘फायर ऑडिट’च्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब
जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचे फायर ऑडिट झाले नव्हते. महापालिकेने केलेल्या तपासणीत काही त्रुटी आढळल्या होत्या. त्याची पूर्तता करण्यात जिल्हा रुग्णालयाने टाळाटाळ केली. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, यावर ‘लोकमत’ने पहिल्याच दिवशी प्रकाश टाकला होता.