जामखेड : दोन महिन्यांपूर्वी पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील आदर्की रेल्वे स्टेशननजीक सिग्नलची तोडफोड करून रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या आंतरराज्य टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळण्यात सातारा रेल्वे पोलीसांना यश आले. जामखेड येथून तिघांना सापळा लावून जेरबंद करण्यात आले. या कारवाईत जामखेड पोलीसांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.रेल्वे सुरक्षा बल सातारा यांनी दिलेली माहिती अशी की, सातारा, जळगाव, सोलापूर, हैद्राबाद, गुंटकल अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन रेल्वेचे सिग्नल तोडून गाडी थांबल्यानंतर प्रवाशांचे पैसे, सोने, मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तू लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमागील गुन्हेगारांचा रेल्वे पोलीस शोध घेत होते. या टोळीतील काही सदस्य जामखेड येथे असल्याची माहिती रेल्वे पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार सातारा रेल्वे पोलीसांचे एक पथक जामखेडमध्ये दाखल झाले होते. जामखेड पोलीसांच्या मदतीने रेल्वे पोलीसांनी जामखेड शहरातील वेगवेगळ्या भागात सापळा रचून रोहित गोरख राळेभात (वय २४), विनोद सखाराम जाधव (३०), बाबू मोहन कसबे (२५ सर्व राहणार जामखेड, जि. अहमदनगर) यांना अटक केली.त्यांच्याकडून वाहने व सिग्नल तोडण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या टोळीने साता-यामध्ये रहिमतपूर, सालपे, आदर्की, पळशी, शेणोली या ठिकाणी गाडी आडवून लूट केल्याचे कबूल केल्याची माहिती रेल्वे पोलीसांनी दिली आहे. या टोळीतील आणखीन चार ते पाच साथीदार फरार आहेत. आरपीएफच्या या कारवाईला जामखेडचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव सहारे यांनी दुजोरा दिला आहे.
रेल्वे प्रवाशांना लुटण्या-या टोळीतील जामखेड येथील तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 6:10 PM