श्रीगोंदा : बारामतीच्या 'त्या' कोरोना बाधित व्यक्तीच्या श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण संपर्कात आले होते. त्यांची नगर येथील सरकारी रुग्णालयात सोमवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. बारामती येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामीण भागातील तीन जण आल्याचे समोर आले आहे. २० मार्च रोजी या तीनही व्यक्ती शेतीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी 'या' कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, त्या व्यक्तीच्या हे तिघे संपर्कात आले होते. तिघांची वैद्यकीय तपासणी नगर येथील सिव्हिल रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर च ते कोरोनाबाधित झाले आहेत किंवा नाही ते समजणार आहे. निष्काळजीपणा बरोबर नाही आपल्या ग्रामीण भागात कोरोना येऊ शकत नाही, अशा अविर्भावात काही मंडळी लॉकडाऊन असतानाही बेफिकिरपणे रस्त्यावरून फिरत आहेत. प्रशासन वारंवार सांगूनही लोकांच्या मानसिकतेत फरक पडत नाही. आता आता तरी बेफिकीरपणा सोडा, असे असेही डॉ.नितीन खामकर यांंनी सांगितले.
बारामतीतील कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंद्यातील तिघे जण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 2:59 PM