अहमदनगर : सहलीहून तसेच कामानिमित्त परदेशातून जाऊन आलेल्या जिल्ह्यातील २७ जणांची तपासणी रविवारी नगर येथील जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. यातील ७ जण हे बाहेरील देशातून परत आलेले आहेत, तर २० जण हे स्वत:हून तपासणीसाठी दवाखान्यात दाखल झाले होते. यापैकी दोन जण संशयित वाटल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठवण्यात आले आहेत.दोन संशयितांना देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. राहिलेल्या २५ जणांना तपासणी व औषधोपचार करून घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी रविवारी दिली. नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, मात्र, पूर्वकाळजी घ्यावी, असे आवाहन द्विवेदी यांनी केले आहे. रविवारी तपासणीसाठी दाखल झालेल्या एकूण २७ रुग्णांमध्ये १७ पुरुष तर १० महिलांचा समावेश होता. परदेशातून आलेल्या सात नागरिकांपैकी चार जण दुबई, एक जण यूएसए, एक जर्मनी तर एक जण इंग्लंडहून आला आहे.जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाºयांशी चर्चा करुन कोरोना विषाणू संसर्गा संदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत या नागरिकांनी तपासणी करुन घेतली, असे द्विवेदी यांनी सांगितले.---१६ जणांचे तपासणी अहवाल प्रतीक्षेतकोरोना रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या १६ जणांच्या रक्त व थुंकीचे नमुने पुणे येथील एनआयव्ही संस्थेत पाठविण्यात आले होते. त्यांचे तपासणी अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत मिळाले नव्हते. त्यांच्या अहवालाकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नगरच्या जिल्हा रुग्णालयात २७ जणांची तपासणी, दोन संशयितांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 11:10 PM