शेवगाव (जि. अहमदनगर) : ट्रकद्वारे वाळू वाहतूक सुरु ठेवण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तिघा पोलीस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात संबंधित तिघेही आरोपी स्वतःहून हजर झाले. दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना २४ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कर्मचारी वसंत कान्हू फुलमाळी (रा. शंकरनगर, पाथर्डी), संदीप वसंत चव्हाण (रा. पोलीस वसाहत, शेवगाव ), कैलास नारायण पवार (रा. शंकरनगर, पाथर्डी) हे तिघेही जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर स्वतः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजर झाले. नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान तिघे पसार झाल्याने त्यांचा शोध पोलीस घेत होते.
पाथर्डी तालुक्यातील २७ वर्षीय तक्रारदाराची वाळूची ट्रक, उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी पकडली होती. दरम्यान, ट्रकवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात व वाळू वाहतुकीसाठी ट्रक चालू देण्यासाठी हप्ता म्हणून लाचेची मागणी तिघांनी केली होती.