अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिसांनी मागील आठवड्यात पकडलेला आरोपी सादिक बिराजदार याचा मृत्यू वाहनातून पडून जखमी झाल्यामुळे झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवालातून समोर येत आहे. याशिवाय या प्रकरणात आरोपीला आणताना हलगर्जीपणा केला म्हणून भिंगार पोलीस ठाण्याच्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
फरार असलेला पोस्को गुन्ह्यातील आरोपी सादिक बिराजदार याला भिंगार कँप पोलिसांनी १५ ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाल्याजवळ त्याने गाडीतून उडी मारली व तो त्यात जखमी झाला, अशी फिर्याद पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, बिराजदारच्या पत्नीनेही एक फिर्याद दिली असून त्यात बाहेरून आलेल्या पाच जणांनी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पती बिराजदारला मारहाण करून जखमी केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दि. २१ ॲागस्ट रोजी बिराजदारचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणात दोषी कोण व बिराजदारचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
दरम्यान, सोमवारी (दि.२३) या प्रकरणी उपअधीक्षक विशाल ढुमे यांनी केलेला प्राथमिक चौकशीचा अहवाल व शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत बिराजदार प्रकरणाचे तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख, सहायक फौजदार मैनुद्दिन इस्माईल शेख व पोलीस नाईक अंबादास पालवे यांना हलगर्जीपणा केल्याने पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार बिराजदारचा मृत्यू वाहनातून पडून झाल्याचे दिसत आहे. तरीही बिराजदारच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांच्या फिर्यादीनुसार सखोल तपास सुरू आहे. सीआयडीही या प्रकरणी तपास करत आहे. त्यामुळे हा सर्व तपास पूर्ण झाल्यावर बिराजदारचा मृत्यू कशामुळे झाला व यात अंतिमत: दोषी कोण हे समोर येईल, असे अधीक्षक पाटील म्हणाले.
----------------