कोपरगाव : कारागृह फोडून पळालेल्या पाप्या शेख गँगच्या तीन कैद्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली़ सागर शिवाजी काळे, विनोद सुभाष जाधव व आबासाहेब बाबासाहेब लांडगे अशी या आरोपींची नावे आहेत़ याबाबत तुरूंग अधिकारी चंद्रशेखर कुलथे यांनी दिलेली माहिती अशी की, खून, दरोडा, हाणामारी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पाप्या उर्फ सलीम ख्वाजा शेख, विनोद सुभाष जाधव, आबासाहेब बाबासाहेब लांडगे, सागर शिवाजी काळे व विकास पोपट चव्हाण या पाच जणांनी कोपरगाव येथील कारागृहाच्या खिडकीचे गज कापून २८ एप्रिल रोजी रात्री पलायन केले होते़ नंतर त्यांना १ मे रोजी पोलिसांच्या पथकाने पकडले़ यातील सागर काळे, विनोद जाधव व आबासाहेब लांडगे या तीन आरोपींना दि़ ३ मे रोजी कोपरगाव कारागृहात पुन्हा आणण्यात आले़ दि़ ५ रोजी या तिघांना शिर्डी पोलिसांच्या ताब्यात एका गुन्ह्यासंदर्भात वर्ग केले़ दि़ ८ मे रोजी तहसीलदार इंदिरा चौधरी यांनी कारागृह महानिरीक्षकांकडे अशा खतरनाक कैद्यांना कोपरगाव कारागृहातून इतरत्र हलवावे, असा प्रस्ताव पाठविला़ त्यानसार दि़ १३ रोजी येरवडा कारागृहात तिघांना हलविण्याची परवानगी मिळाली़ निवडणूक बंदोबस्तामुळे पोलीस बळ मिळू शकत नव्हते़ त्यानंतर १८ मे रोजी तिघांची शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गलांडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकासोबत येरवड्याकडे रवानगी करण्यात आली असल्याचे तुरूंग अधिकारी कुलथे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
तीन कैद्यांची येरवड्यात रवानगी
By admin | Published: May 18, 2014 11:34 PM