तिसगाव : पाथर्डी तालुक्याची कामधेनू असलेल्या वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या तीन जागा बिनविरोध झाल्या असून, छाननी प्रक्रियेत ७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
१९ जागांसाठी तब्बल १२० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी या सर्व दाखल अर्जांची प्रांताधिकारी कार्यालयात छाननी झाली. छाननीत ७३ अर्ज वैध ठरले. पाथर्डी गटातील दोन जागांसाठी विद्यमान संचालक मंडळातील रामकिसन काकडे व सुभाषराव बुधवंत यांचा एकमेव अर्ज राहिल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद सहकारी संस्था मतदारसंघातून एका जागेसाठी कारखाना अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, आमदार मोनिका राजळे व जिल्हा परिषद राहुल राजळे या तिघांचेच एकूण दहा अर्ज राहिले आहेत. ही जागा बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे.
वैध ठरलेले गटनिहाय उमेदवारी अर्ज असे : कासार पिंपळगाव (२ जागेसाठी ९ अर्ज), चितळी गट (३ जागेसाठी ११ अर्ज), कोरडगाव गट (२ जागेसाठी ४ अर्ज), पाथर्डी गट (२ जागेसाठी २ अर्ज), मिरी गट (२ जागेसाठी ८ अर्ज), टाकळीमानूर गट (२ जागेसाठी १४ अर्ज), ब वर्ग सहकारी संस्था (१ जागेसाठी तिघांचे १० अर्ज), अनुसूचित जाती-जमाती (१ जागेसाठी ४ अर्ज), महिला प्रतिनिधी (२ जागेसाठी ८ अर्ज), इतर मागास वर्ग (१ जागेसाठी ५ अर्ज), भटक्या-विमुक्त जाती (१ जागेसाठी ५ अर्ज) असे एकुण ७३ अर्ज वैध ठरले. १ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असून, त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.