अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे यापुढे बाधित रुग्णांना होम आयसोलेशनऐवजी कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तीन हजार बेड सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.
शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेतला. जिल्ह्यात सध्या ४९८५ बाधित रुग्ण असून काही तालुक्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता रुग्णांना होम आयसोलेशनऐवजी कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्याच्या सूचना संबंधित तहसीलदारांनी दिल्या आहेत. त्यासाठी कोरोना सेंटर सज्ज करण्यात आले असून खासगी आणि शासकीय असे तीन हजार बेड सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
---------------
तूर्त लॉकडाऊनचा विचार नाही
राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन झाले असले तरी नगर जिल्ह्यात अजून तशी स्थिती नाही. त्यामुळे तूर्ततरी लॉकडाऊनचा कोणताही विचार प्रशासनाने केलेला नाही; मात्र नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी यापुढे केली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.