राहुरी (जि.अहमदनगर) : राहुरी तालुक्यातील बारागावनांदूर येथे मुळा धरणाच्या भिंतीजवळ असलेल्या आदिवासी समाजाच्या तीन झोपड्यांना लागलेल्या आगीत दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. मुळा धरण परिसरात मासेमारी करणाऱ्या 12 आदिवासी कुटुंबांच्या झोपड्या आहेत.
सोमवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास यातील तीन झोपड्यांना अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा डोंब झाला. या आगीत विजय किसन बर्डे यांच्या दोन लहान मुलींचा होरपळून मृत्यू झाला. नेहा विजय बर्डे (वय 11 महिने) तर निकिता विजय बर्डे (वय 4 वर्षे ) अशी त्यांची नावे आहेत. आगीत एक मोटारसायकल व संसारोपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या. इतर दोन झोपड्या किसन पंडू बर्डे व अशोक सुनील पवार यांच्या आहेत. या दोन्ही झोपड्या आगीत खाक झाल्या असून आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. तहसीलदार फसउद्दीन शेख, पोलीस प्रशासनाने पाहणी करुन पंचनामा केला आहे. बारागाव नांदूर येथील विश्वास पवार, प्रभाकर गाडे, निवृत्ती देशमुख, युवराज गाडे, जिल्लुभाई पिरजादे, भाऊसाहेब कोहोकडे, हिरामण शिंदे, विजय बर्डे, बाळासाहेब बर्डे, छबू पवार, संजय बाचकर व ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन आपद्ग्रस्तांना सहकार्य केले. आमदार शिवाजी कर्डिले यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली.