तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकमधून ३०० लिटर डिझेल चोरीची घटना नुकतीच घडली. यानंतर दोन दिवसांनी गावानजीकच्या एका पेट्रोल पंपावर रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या तीन मालवाहू ट्रकमधून चोरट्यांनी पुन्हा ३०० लिटर डिझेलची चोरी केली. बुधवारी (दि. २४ ) सकाळी सहा वाजेच्या सुमारास डिझेल चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक तिरुपती बालाजी पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी चालक सोमनाथ सज्जन गिड्डे (ट्रक क्रमांक एम.एच.-२४, ए.बी.-७५७६ ), चालक चांगदेव हरिबा सुर्वे (ट्रक क्रमांक एम.एच.-१३, ए.एक्स.-२३०५ दोघेही रा.मोडनिंब, ता.माढा, जि.सोलापूर), चालक दिलदार जब्बार (ट्रक क्रमांक ए.पी.-०४, वाय २८६९, रा.तुंकूर, कर्नाटक ) यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रक रात्रीच्यावेळी उभ्या केलेल्या होत्या. चालक व क्लिनर ट्रकमध्येच झोपलेले होते. दरम्यान मध्यरात्रीनंतर एक ते तीनच्या सुमारास चोरट्यांनी तिनही ट्रकच्या इंधन टाक्यांची झाकणे तोडून पहिल्या ट्रकमधून १७० लिटर दुसऱ्या ट्रकमधून ९० लिटर, तर तिसऱ्या ट्रकमधून ५० लिटर डिझेलची चोरी केली. डिझेल चोरीसाठी चोरटे चारचाकी वाहन, टिल्लू मोटर व पाईपचा वापर करतात.
सोमवारी (दि.२२ ) रात्री गावानजीकच्या समर्थ पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी ३०० लिटर डिझेल चोरी केल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी पुन्हा तिरुपती बालाजी पेट्रोल पंपावर उभ्या केलेल्या तीन ट्रकमधून ३०० लिटर डिझेलची चोरी झाली.