अहमदनगर: शहरासह जिल्ह्यात विजेच्या कडकडाटांसह बुधवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारा पडल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंद्या तालुक्यात सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास आकशात काळे ढग दाटून आले. भंडारदरा परिसरात दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. राहुरी तालुक्यातील लोणी, कोल्हार, बाभळेश्वर परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील द्राक्षबाग, डाळिंब, गहू हरभरा पिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे या भागातील विजही गायब झाली. कर्जत परिसरातही पावसाने हजेरी लावली. नगर शहरातील सावेडी, नागापूर आणि बोल्हेगाव परिसरात वादळी वा-यासह पाऊस झाला. त्यामुळे या भागातील वीज पुरवठाही बराच वेळ खंडित झाला होता. नेवासा शहर व परिसरात वादळी वाºयासह पाऊस पडला. श्रीगोंद्यात आढळगाव, कोकणगाव, भावडी, घोडेगाव, तांदळी दुमाला भागातील गहू व हरभरा पिकाचे नुकसान झाले. अकोले तालुक्यातही काही भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नगर तालुक्यातील काही भागात मंगळवारी पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले असून, दुस-या दिवशी बुधवारी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील ठिकठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधारात आहेत.
नगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस; शेती पिकांचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 7:39 PM