मच्छिंद्र देशमुख
कोतूळ - गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असल्याने सर्व वाहने बंद आहेत. परराज्यातील मजूर अनेक ठिकाणी अडकून पडले असल्याने आपले घर जवळ करण्यासाठी तिखीराम आपल्या दीड वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन ओतूर ते उत्तर प्रदेश हा हजार मैल प्रवास करत आहे.
उत्तर प्रदेशातील बाडवाणी जिल्ह्यातील धावडी या गावातील एकाच कुटुंबातील पंधरा शेतमजूर पुणे जिल्ह्यात ओतूर या ठिकाणी कांदे काढण्यासाठी आले होते. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांत लॉकडाऊनमुळे मजुरी बंद झाली. जवळचे पैसेही संपले. दहा ते पंधरा दिवसांत अनेक सेवाभावी लोकांनी अन्न पाण्याची सोय केली. मात्र आता आपले गाव गाठायचे या इराद्याने तिखीराम, त्याची पत्नी, आई ,भाऊ व नातेवाईक असे पंधरा लोक ओतूर ते उत्तरप्रदेशात पायी निघाले.
दोन दिवसांपूर्वी कोतूळात तिखीराम रडत पायी चालताना दिसला. चौकशी केली असता त्याने आपबीती सांगितली. तिखीरामचे कुटुंब पायी चार मैल पुढे गेले होते. मात्र लहान बाळ झोपलेले असल्याने त्याला कुटुंबासोबत पटपट चालता येत नव्हते. सकाळी सहा ते बारा या सहा तासात ते ओतूर ते कोतूळ हे चाळीस मैल अंतर पायी आले होते. कहाणी सांगितल्यावर त्याला फळे, बिस्कीटे दिली. संगमनेरपर्यंत अडचण येणार नाही, अशी व्यवस्था केली. आम्ही दहा ते बारा दिवसांत घरी पोहचू असे तिखीराम सांगत होता.
मला व माझ्या कुटुंबाला इथपर्यंत येईपर्यंत अनेकांनी जेवण, चहा तर कुणी फळे बांधून दिले. जोपर्यंत महाराष्ट्र आहे, तो पर्यंत आम्हाला पोटाची भिती नाही. मात्र आम्हाला आमच्या गावात घेतात की नाही हा प्रश्न आहे. – तिखिराम