श्रीगोंदा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच प्रकारातील लोककलावंताची फरफट सुरू असून गावोगावी जागरण गोंधळ करून उपजीविका भागविणाऱ्या वाघ्या-मुरळी या कलावंतांवरही उपासमारीची वेळ आली आहे.
घरोघरी होणारे जागरण गोंधळाचे कार्यक्रम वर्षभरापासून बंद असल्याने या कलाकारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात सुमारे ३० हजार वाघ्या, मुरळी व इतर वाद्य कलावंतांची संख्या आहे. एकूण १४ हजार जागरण गोंधळाच्या पार्ट्या आहेत. ग्रामीण भागात मुलाचा विवाह झाल्यानंतर कुल देवतांची पूजा करण्यासाठी जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. या लोकपरंपरेतून महाराष्ट्रभर लोककलावंतांना रोजगार मिळून त्यांची रोजीरोटी चालते. कोरोनामुळे मात्र सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आहे. कार्यक्रम झाला तरी ५० लोकांच्या उपस्थितीचे बंधन आहे. त्यामुळे लोक कार्यक्रम करणे टाळत आहेत. जागरण गोंधळाचे कार्यक्रम बंद झाल्याने या कलावंतांना पर्यायी रोजगार शोधून कुटुंब चालविण्याची वेळ आली आहे. शासनाने लोककलावंतांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कलाकारांच्या विविध संघटनांकडून सातत्याने होत आहे. प्रत्यक्षात मात्र या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत सैरभैर झालेल्या लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
--------------------------
घरोघरी होणाऱ्या जागरणगोंधळ कार्यक्रमाच्या माध्यमातून हजारो लाेककलावंतांना रोजगार मिळतो. अशा कार्यक्रमातून कलावंत समाजाचे प्रबोधन करतात. कोरोनामुळे मात्र या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. आता शासनाने ५० लोकांच्या उपस्थित कार्यक्रम करण्यास शासनाने परवानगी द्यावी,
- नानासाहेब सांळुके,
तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वाघ्या मुरळी परिषद
फोटो ०४ जागरणगोंधळ