अहमदनगर : जिल्ह्यातील लोकांचे आभार मानले पाहिजेत. राहुल गांधीचे आपण जोरदार स्वागत करत आहात. विरोधी पक्षनेत्याने अन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे ‘आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी लावण्याची वेळ काँग्रेसवर आली असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीरामपूर येथील सभेत बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे उपस्थित होते.फडणवीस म्हणाले, आज राहुल गांधी येथे येतील. गरिबांना न्याय देतो असे सांगतील. त्यांचे आजोबा, आजी, वडील, आईला गरीबी हटविता आली नाही. आता हे गरीबी हटविणार आहेत. काय खाऊन गरीबी हटविणार हे कळायला मार्ग नाही. गरीबांना ७२ हजार रुपयांना देणार असे राहुल गांधी सांगतात. पण कुठून देणार याचे उत्तर देत नाहीत. तुमची सत्ता असताना साधे ७२ पैसे यांनी गरिबांना दिले नाहीत. विरोधक नुसते मोदीजींवर टीका करतात. यांना सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत आहेत. पुढील काळात राहुल गांधी यांच्या भाषण मनोरंजनासाठी दाखविले जाईल. या देशामध्ये गरिबीच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी लढले आहेत. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे.
‘आमची कोठेही शाखा नाही’ अशी पाटी लावण्याची वेळ काँग्रेसवर आलीय : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:06 PM