अहमदनगर : स्वातंत्र्यानंतर घटनेने सर्वांना समान अधिकार प्रदान केले़ घटनेच्या न्यायाप्रमाणे व्यवस्था चालावी अशी अपेक्षा असताना हिंदू राष्ट्र निर्मितीची हाक देण्यात येत आहे़ सर्वसामान्यांच्या अधिकारांवरच गदा आणणारी ही विचारसरणी आहे़ सध्या देशात सांस्कृतिक आणि आर्थिक दहशतवाद सुरू झाला असून, या व्यवस्थेविरोधात तीव्र संघर्षाची वेळ आली असल्याचे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते भालचंद्र कांगो यांनी केले़ भारिप बहुजन महासंघ, समविचारी पक्ष व विविध पुरोगामी संघटनांच्यावतीने रविवारी शहरातील रेसीडेन्सीअल विद्यालय प्रांगणात आयोजित राज्यव्यापी जातीअंत परिषदेत ते बोलत होते़ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला राज्यभरातून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते़ कांगो म्हणाले, समता, स्वातंत्र्य व बंधुता हे घटनेने दिलेले तत्व आहेत़ हा विचार बाजूला ठेवून भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी स्वत:चा अजेंडा राबवित आहे़ नवीन आर्थिक धोरण सर्वसामान्यांच्या विरोधातील आहे़ लोककल्याणकारी योजनांसाठी दरवर्षी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीला मोदी सरकारने कात्री लावली़ सरकारी नोकऱ्या कमी करण्याचे आता नियोजन सुरू आहे़ याचा सर्वात मोठा फटका हा तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्यांना बसणार आहे़ पंतप्रधान मोदी हे उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेत आहेत़ सरकारी यंत्रणेसह सर्वत्र आपलीच माणसे नियुक्त केली जात आहेत़ यांना डॉ़ बाबासाहेबांच्या विचाराशी काहीच बांधिलकी नाही़ काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे भाजपा सत्तेत आले़ ते या सत्तेचा दुरुपयोग करत आहे़ भाजपा आणि संघाच्या घातक विचारसरणीला मदत करणाऱ्या उद्योगपतींविरोधातही संघर्ष करावा लागणार असल्याचे कांगो म्हणाले़ भारत पाटणकर म्हणाले, नगरमध्ये प्रथमच जातीअंत परिषद होत असून, देशभरात येणाऱ्या काळात अशा परिषदांमधून प्रबोधन चळवळ उभी केली जाणार आहे़ देशात प्रचलित जातीव्यवस्थेची उतरंड काळाच्या ओघात नष्ट होणे गरजेचे होते़ प्रत्यक्षात मात्र, संघ आणि त्याच्या विचाराच्या संघटना याला पूरक धोरण घेत आहेत़ धर्मांध आणि जातीयतेच्या विरोधात संघर्ष करावा लागणार असल्याचे ते म्हणाले़ प्रास्ताविक कॉ़ अनंत लोखंडे यांनी केले़ यावेळी कॉ़ भीमराव बनसोड, प्रतिमा परदेशी, फादर बिशप कांबळे, स्मिता पानसरे, गील अवमेट, वैशाली चांदणे, शैलेंद्र कांबळे, अरुण जाधव, कॉ़ सुभाष लांडे यांनी मनोगत व्यक्त करत जातीअंताकडून राष्ट्रवादाकडे जाण्याची हाक दिली़ संघाने समोरासमोर चर्चा करावी आरक्षण, शिक्षण आणि हिंदू राष्ट्रनिर्मितीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भूमिका मांडत आहे़ राष्ट्र उभारणीची जबाबदारी आम्हीच पेलू शकतो असे ते म्हणतात़ या सर्व मुद्यांवर त्यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी़ जातीअंतासाठी आणि जातीव्यवस्थेला नामशेष करण्यासाठी त्यांचे काय धोरण आहे हे त्यांनी स्पष्ट करावे़ असे आवाहन यावेळी परिषदेचे अध्यक्ष अॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी केले़ जातीअंत परिषदेसाठी राज्यभरातून आलेल्या विविध संघटना व समविचारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जातमुक्तीच्या लढ्यासाठी अॅड़ प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करण्याचा मनोदय व्यक्त केला़ परिषदेतील मागण्या संत परंपरेला अनुसरून स्त्री-पुरूष समानतेचा समान नागरी कायदा करावा, शासकीय संस्थेतून उत्तीर्ण झालेल्यांची मंदिरात पुजारी म्हणून नेमणूक करावी, सर्व धर्मीयांच्या धार्मिक अधिकाराचे संहितीकरण करावे, ७० टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना इच्छेप्रमाणे शिक्षण द्यावे तसेच या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, आंतरजातीय विवाहितांच्या अपत्यांच्या शासकीय अर्जांमध्ये जातीचा उल्लेख नसावा, सार्वभौम व स्वावलंबनासाठी आवश्यक आर्थिक क्षेत्राची मालकी केंद्रसत्तेकडे ठेवावी़
सांस्कृतिक दहशतवाद विरोधात संघर्षाची वेळ
By admin | Published: December 20, 2015 11:21 PM