श्रीरामपूर : केंद्रातील भाजप सरकार हे केवळ नफेखोर आणि भांडवलदारांसाठी काम करत असून त्यांना चले जाव म्हणण्याची वेळ आल्याचा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.
दिल्लीतील शेतकरी आंदोलकांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदच्या हाकेला काँग्रेस पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. त्यासाठी येथील प्रशासकीय इमारतीसमोर आयोजित धरणे आंदोलनप्रसंगी थोरात बोलत होते. यावेळी आ. लहू कानडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कार्याध्यक्ष सचिन गुजर, अंकुश कानडे, ज्ञानदेव वाफारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, ज्ञानेश्वर मुरकुटे, पं. स. सदस्य डॉ.वंदना मुरकुटे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावेळी काँग्रेसचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, केंद्राने केलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांमुळे भांडवलदारांना नफेखोरीसाठी मोकळे रान मिळणार आहे. त्यामुळे शहरातील जनतेला जादा पैसे देऊन शेतमाल खरेदी करावा लागेल. पंजाब राज्यात धान्याच्या साठेबाजीसाठी मोठ-मोठी गोदामे बांधण्यात आली आहेत. मात्र, या कायद्यांमुळे शेतकऱ्यांवरील किमान आधारभूत दराचे छत हिरावून घेतले जाणार आहे.
या कायद्यांमुळे जर खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे बुडविले तर प्रांताधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागेल. न्यायालयात जाण्याचा शेतकऱ्यांचा अधिकार नष्ट करून त्यांचे संरक्षण काढण्यात आले आहे. आहे. बाजार समित्याही संपविण्याचा त्यामागे डाव आहे.
दिल्लीतील आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत सरकारची मजल गेली. या ऐतिहासिक आंदोलनाची जगभर दखल घेतली जात असताना पंतप्रधान मात्र शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत, अशी टीकाही थोरात यांनी केली.
आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाने मिळवून दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता भाजपने संपुष्टात आणल्याचा आरोप केला. केंद्र सरकार हे भांडवलदारांचे हस्तक व कष्टकऱ्यांचे शत्रू आहे. काँग्रेसने उभारलेले सरकारी उद्योग विकण्याचा त्यांनी घाट घातला आहे, असे ते म्हणाले.
यावेळी नगरसेवक मनोज लबडे, मुन्ना पठाण, राजेंद्र पाऊलबुद्धे, बाबासाहेब कोळसे, समीन बागवान, अभिजित लिप्टे आदी उपस्थित होते.
------------
ते आंदोलक कुठे आहेत?
केंद्रातील तत्कालीन काँग्रेस सरकारमध्ये झालेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन करणारी मंडळी आता कुठे आहे? असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला. पेट्रोल शंभर रुपये तर सिलिंडर ९०० रुपयांवर गेला तरीही ती मंडळी आता शांत का? असा टोला थोरात यांनी लगावला.
------
२६संगमनेर आंदोलन
...