- शिवाजी पवार श्रीरामपूर : पोलिस तपासासाठी आल्याचे समजताच पेटवून घेऊन आत्महत्या करणार्या तरुणाच्या घटनेचे पडसाद मंगळवारी विधीमंडळाच्या अधिवेशनात उमटले. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिसांवर छळ केल्याचा तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांची याप्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी आमदार लहू कानडे यांनी केली.
तालुक्यातील दत्तनगर येथे जाकीर बबन पठारे या तरुणाने पेटवून घेऊन आत्महत्या केली होती. शनिवारी जालना जिल्ह्यातील पोलिस तपासासाठी आले असता अटकेच्या भीतीने पठारे याने एका दुकानामध्ये पेटवून घेतले होते. त्यानंतर पठारे याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता भरती केले होते. मात्र जास्त भाजल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
तरुण पठारे याच्यावर जालना जिल्ह्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. लग्नाळू तरुणांना नवरी देण्याचे आमीष दाखवून फसवणूक झाल्याचा हा गुन्हा होता. या प्रकरणी तेथील पोलिस तपास करत असताना दत्तनगर येथे पठारे याच्या चौकशीकरिता आले होते.
दरम्यान, याप्रकरणी आमदार लहू कानडे यांनी मंगळवारी अधिवेशनात आवाज उठविला. मयत गरीब तरुणावर गुन्हा दाखल असला तरी त्याच्यावर अन्याय झाल्याची कुटुंबीयांची भावना आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून त्याने पेटवून घेतल्याचे तसेच पोलिसांनीच त्याला जाळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. त्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक तसेच उपविभागीय पोलिस अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आमदार कानडे यांनी केली. या दोन्ही पोलिस अधिकार्यांना तातडीने तेथून बदलण्यात यावे, असेही कानडे यावेळी म्हणाले.आमदार कानडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.