तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावचा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. याबाबत ग्रामस्थांसह व्यापारीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. येथील वीज उपकेंद्राचा अधिभार कमी करून शहराला सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास वृद्धेश्वर चौक येथे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा उपसरपंच फिरोज पठाण यांनी दिला आहे.
याबाबत महावितरणच्या जिल्हा अधीक्षकांना गुरुवारी निवेदन दिले आहे. शहरातील नागरिकांना सातत्याने विजेच्या तांत्रिक बिघाडाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामस्थांसह व्यापारी वर्गालाही मनस्ताप सहन करण्याची वेळ आलेली आहे. दोन दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याचा परिणाम व्यापारी बाजारपेठेवरही झाला आहे. येथील उपकेंद्रावर करंजी, देवराई, मांडवे, घाटशिरस गावांच्या गावठाणचा अधिभार आहे. त्यामुळे सातत्याने तांत्रिक बिघाड होत असल्याच्या तक्रारी आहेत. या चारही गावांच्या गावठाणचा अधिभार भोसे उपकेंद्राला जोडावा. अनेक वर्षांपासून तिसगाव उपकेंद्राची दुरुस्ती न झाल्यामुळे या ठिकाणी वारंवार तांत्रिक बिघाड होत आहेत. आठ दिवसात संपूर्ण वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वितरण अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना न देता रास्ता रोको आंदोलन केले जाईल, असेही उपसरपंच फिरोज पठाण यांनी सांगितले.
निवेदनावर बाळासाहेब लवांडे, ग्रामपंचायत सदस्य अर्शद शेख, शौकत पठाण, मनोज ससाने, अनिल वाघमारे, पद्माकर पाथरे, राजू भुजबळ, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल रांधवणे, रफिक शेख सर, युवा नेते अरिफ तांबोळी, सिकंदर पठाण, राजेखा पठाण, वाहिद शेख, अरुण रायकर, दत्ता कंगे आदींच्या सह्या आहेत.