अरुण वाघमोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: विधानसभा निवडणूक जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या ज्योतिषांकडील चकरा वाढल्या आहेत. राजयोग आहे का?, ग्रहदशा कशी आहे, काही अडचण असेल तर त्यावर उपाय काय? आदी शंकांचे निरसन इच्छुक ज्योतिषांकडून करून घेत आहेत. ज्योतिषांकडूनही इच्छुकांना पूजाअर्चा, होमहवन, अनुष्ठान, पेहरावातील बदल, रत्न परिधान करणे आदी उपाय सांगितले जात आहेत.
अर्ज भरण्यासाठी मुहूर्त कोणता?
पक्षाची उमेदवारी मिळेल का, मिळाली तर जनमत आपल्या बाजूने असेल का, निवडून येण्याची शक्यता किती राहील, यासह अर्ज भरण्याचा शुभमुहूर्त कोणता, त्यावेळी कोणता पोशाख परिधान करावयाचा, कार्यालयात कोणत्या देवाचे फोटो लावायचे, जनसंपर्क कार्यालयाचे द्वार कोणत्या दिशेने असावे आदींबाबत ज्योतिषांकडून इच्छुकांना मार्गदर्शन केले जात आहे.
देवांना नवस, हातात गंडे-दोरे
एखादे काम सिद्धीस जावे, यासाठी देवाला नवस करण्याची जुनी परंपरा आहे. निवडणुकीच्या काळात बहुतांश उमेदवार देवस्थानाच्या ठिकाणी जाऊन नवस बोलतात, दानधर्म करतात, तसेच बोटात अंगठ्या, वेगवेगळी रत्ने घालतात. हातात धागे आणि गळ्यात विशिष्ट चिन्ह असलेले लॉकेट घालताना दिसतात.
विरोधकांच्या कुंडलीचीही चाचपणी
काही नेते ज्योतिषांकडून स्वत:ची कुंडली शुद्ध करून घेताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या कुंडलीचीही चाचपणी करतात. त्यानुसार मग पुढील राजकीय डावपेच ठरविले जातात.
निवडणूक काळात काही नेत्यांचा ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य समजून घेण्याचा कल असतो. कुंडली चुकीची असली तर भविष्यही चुकते. कुंडलीत ३, ६, ११ घरे राजयोगाने प्रबळ असावी लागतात. लग्नेश व भाग्यही प्रबळ असावे लागते.- प्रा. जवाहर मुथा, ज्योतिष अभ्यासक
शक्तिपीठ महामार्गास विरोध; १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पाडणार
कोल्हापूर: शक्तिपीठ महामार्ग रद्द न करणाऱ्या महायुतीचे १२ जिल्ह्यांतील ७२ उमेदवार पराभूत करण्याचा निर्धार कोल्हापुरात सोमवारी झालेल्या राज्यव्यापी निर्धार परिषदेत शेतकऱ्यांनी ठरावाद्वारे केला. यावेळी शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्ग विरोधात लढण्याची शपथ घेतली.
कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. खासदार शाहू छत्रपती म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत, परंतु सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. आता राजकीय परिवर्तन झाल्याखेरीज शक्तिपीठ महामार्ग रद्द होणार नाही.