अहमदनगर : कर्करोगाची अनेक कारणे आहेत. मात्र तंबाखूजन्य पदार्थ आणि दारु यामुळे कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे. तोंडात पांढरा चट्टा किंवा लाल चट्टा होणे किंवा तोंडाची उघडिप कमी होणे (सबम्यूकस फायब्रोसिस) आदी लक्षणे दिसत असल्यास भविष्यात कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याचा धोका असतो. अशावेळी कॅन्सरतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेणे आवश्यक आहे.
वेळेवर या व्याधींवर शस्त्रक्रिया झाल्यास कॅन्सरचा धोका ब-याच अंशी कमी होऊ शकतो. तोंडातील साधारण जखमा वेदनादायक असतात. परंतू ५ ते ७ दिवसांत भरतात. परंतु तोंडातील जखम २ आठवड्यांपेक्षा अधिक वेळेत भरत नसेल व अल्प वेदनादायी असेल तर वेळेवर तज्ज्ञांचा सल्ल घेता पाहिजे. दुर्लक्ष झाल्यास तोंडातील कॅन्सरचा शिरकाव मानेतील लसिकाग्रंथीमध्ये होऊन मानेतही गाठ हळूवारपणे वाढत जाते. ही गाठ सुध्दा दुखत नसल्याने पुन्हा दुर्लक्ष संभवू शकतो.
कॅन्सरतज्ज्ञांच्या तपासणीत गाठ प्राथमिक स्तराची असेल तर स्कॅनची गरज नाही. परंतु वाढीव स्तरावर सिटी स्कॅन किंवा एमआरआय करण्याची गरज असते. कॅन्सर फुफ्फुसात पसरण्याचा धोका असल्याने सोबत फुफ्फुसात सिटी स्कॅनही केला जातो. स्तर जाणून घेण्यासाठी पेट स्कॅन करण्याची गरज नाही.
कॅन्सर मानेतील लसिकाग्रंथी मध्ये पसरलेला असतो आणि त्याचा उगम कळून येत नाही. तेव्हा पेट स्कॅन करणे गरजेचे असते़ प्रत्यक्षात कॅन्सर होऊच नये, यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळी घेणे गरजेचे आहे. व्यसमुक्त जीवन हाच सुदृढ आरोग्याचा मंत्र आहे असे डॉ़. सोनवणे यांनी सांगितले.