- योगेश गुंडकेडगाव (अहमदनगर) - आमचा शंभर कॅरेट टोमॅटो फुकट देणे आहे. आम्ही पदरमोड करून तो तोडून देतो. सरकारने तो घेऊन जावा. कुपनावर सर्वसामान्य लोकांना त्याचे वाटप करा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील शेतकरी संतोष लिंभोरे यांनी व्यक्त केली.एक महिन्यांपूर्वी टोमॅटोच्या किमती गगनाला भिडलेल्या होत्या. अखेर केंद्र सरकारला धोरणात बदल करत नेपाळमधून टोमॅटो आयतीला परवानगी द्यावी लागली होती; पण आता टोमॅटो कोसळला आहे. टोमॅटोच्या किमती काही दिवसांपूर्वी २०० ते ३०० रुपयांच्या घरात होत्या. आता ते दर अगदी पाच रुपये किलोवर आले आहेत.
संतोष लिंभोरे यांनी दोन एकर टोमॅटोची लागवड केली. त्यासाठी पावणे दोन लाखांचा लागवड खर्च केला. रात्रं-दिवस कष्ट करून लिंभोरे कुटुंबाने पाऊस नसतानाही टोमॅटोची राखण केली. मात्र माल बाजारात विक्रीला नेताच प्रती कॅरेटला ५० रुपयांचा भाव मिळाला.
हा पाहा हिशेब...- तोडणीसाठी मजूर ४० रुपये प्रति कॅरेट अशी मजुरी घेतात. एवढा खर्चही विक्रीतून निघत नाही. - प्रतिकॅरेट भाव मिळाला ५० रुपयांचा. लागवडीसाठी केलेला खर्च, रात्रं-दिवस केलेले कष्ट वेगळेच. - म्हणूनच शेतकऱ्याने तब्बल शंभर कॅरेट टोमॅटो फुकट देणे आहे, अशी भावना व्यक्त केली.