श्रीगोंदा : कुकडी कालवा दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण झाले. त्यामुळे गुरुवारपासून (दि. १४) येडगाव धरणातून आवर्तन सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सूत्रांकडून समजली.आवर्तन सोडण्यास विलंब झाल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील कि.मी १३२ जोड कालव्यावरील १० गावातील संतप्त शेतकऱ्यांनी कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी यांना मंगळवारी सकाळी घेराव घातला होता. घेराव आंदोलनात भाजपाचे शहराध्यक्ष दीपक शिंदे, सेनेचे हरिभाऊ काळे, किरण खेतमाळीस, गोरख आळेकर, सचिन खेतमाळीस, बाळासाहेब शेंडगे, गणेश आस्वर, पोपट बनसोडे, संजय आनंदकर, बाबुशेठ कोंथिबिरे, राहुल खराडे अनिल खेतमाळीस सहभागी झाले होते.कुकडीचे पाणी मिळाले नाही अशा परिस्थितीत पावसानेही दडी मारली आहे. त्यामुळे लोणीव्यंकनाथ, बाबुर्डी, श्रीगोंदा, चोराचीवाडी, लिंपणगाव, पारगाव, मढेवडगाव, घारगाव, बेलवंडी, शिरसगाव बोडखा या गावातील पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे कुकडीचे आवर्तन जलद सोडणे आवश्यक आहे अन्यथा पिके जातील, अशी भीती शेतकºयांनी व्यक्त केली.