चितळी येथे एका १४ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीचा १९ ऑगस्टला एका तरुणाच्या घरात गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला होता. मुलीच्या घरापासून हाकेच्या अंतरावरील आकाश राधू खरात या तरुणाचे हे घर होते. श्रीरामपूर तालुका पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील प्राथमिक माहितीवरून मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आकाश खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आकाश खरात हा अल्पवयीन मुलीला लग्नाची मागणी घालत होता, असे फिर्यादीत मुलीच्या आईने म्हटले होते. घटनेनंतर खरात गावातून फरार झाला आहे. पोलिसांनी या दरम्यान गुन्ह्याचा तपास करताना सागर दत्तू पवार (वय २२) या तरुणालाही गुन्ह्यात आरोपी केले. त्याचा गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी शुक्रवारी वैजापूर येथून त्यास ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पवार याचे घर आकाश खरात याच्याच लोकवस्तीमध्ये असून तो वैजापूर येथे कुटुंबीयांसमवेत कामानिमित्त राहण्यास गेला होता. घटनेवळी तो चितळी येथेच होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातून मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यात मुलीवर अत्याचार झाल्याबाबत स्पष्टता नाही. मात्र तिच्या गुप्तांगावर जखमा झाल्याचे दिसून येते असा अभिप्राय नोंदविण्यात आला आहे. पोलिसांचे या अहवालावर समाधान झालेले नाही. मुलीवर अत्याचार झाला किंवा नाही यावर प्रकाश पडावा, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अतुल भोसले यांच्याशी संपर्क साधला मुलीच्या आईचा पुरवणी जबाब घेऊन अत्याचाराचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पूर्ण पुरावे हाती येण्याची प्रतीक्षा करत आहोत. अहवालाची फेर पडताळणी करणार आहोत, असे ते म्हणाले.
-----