राशीन (जि. अहमदनगर) : दिल्लीत पंतप्रधान कार्यालयात अधिकारी असल्याचे सांगत एका तोतयाने कर्जत पोलिसांना चांगलेच मामा बनविले़ लॉकडाऊनच्या काळात त्याने पोलिसांकडून चक्क व्हीआयपी ट्रिटमेंट घेतली़ पोलिसांचे वाहन या तोतयाच्या दिमतीला होते़ अखेर त्याचे खरे रुप कळताच पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली अन् त्याच्यावर गुन्हा दाखल करत तोतयाला अटक केली़ योगेंद्र उपेंद्र सांगळे. (वय २७ रा़ राशीन) असे या तोतयाचे नाव आहे़ सांगळे याने ‘मी आयएएसची परीक्षा पास झालेलोे असून, सध्या पीएमओ कार्यालयात सिनिअर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे़ सुट्टी घेऊन गावाकडे आलो आहे़’ असे सांगत त्याने कर्जत पोलिसांशी जवळीक साधली़ काही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी तीन दिवसांपूर्वी सांगळे याच्या तोतयागिरीबाबत कर्जत पोलिसांना कल्पना दिली़ त्यानंतर पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांनी सांगळे याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते़ चौकशीत सांगळे हा कुठेही अधिकारी नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली़ याबाबत पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगळे याच्याविरोधात तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सांगळे याने अधिकारी असल्याचे सांगत आणखी कुठे तोतयागिरी केली याची चौकशी आता कर्जत पोलिसांनी सुरू केली आहे़ कर्जतमध्ये या तोतयाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे़
अशी होती त्याची छाप तोतया योगेंद्र सांगळे हा राशीन येथे राहत होता़ राशीनमध्ये पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी राहत असल्याचा समज झाल्याने पोलिसही त्याची उठाठेव करण्यासाठी सज्ज झाले़ सांगळे हा गेल्या अडिच ते तीन महिन्यांत अनेकवेळा पोलिसांच्या वाहनातून घरी आला़ लॉकडाऊनच्या काळात पोलिसांसोबत फिरून तो पोलिसांना आॅर्डरही द्यायचा़ महागडे मोबाईल आणि हायप्रोफाईल राहणीमान असल्यामुळे त्याचा कुणाला संशय आला नाही़ अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी या तोतयासोबत सेल्फी काढली़ सांगळे याचा भंडाफोड झाल्यानंतर त्याच्यासोबत फिरणाºया आणि फोटो काढणाºया पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचीही चांगलीच धांदल उडाली़
तरुणीला फसविलेयोगेंद्र सांगळे याने २०१८ मध्ये मध्यप्रदेश राज्यातील खांडवा येथे एका विवाहित तरुणीशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्क करून तिच्याशी मैत्री केली़ तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यासोबत दोन दिवस राहिला़ सांगळे याचे खरे स्वरूप कळल्यानंतर सदर तरुणीने सांगळे याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्याचीही बाब समोर आली आहे़