अकोले : ‘कार्टून’च्या जमान्यात अन् संगणकाच्या युगात चिमुकले वाचन संस्कृतीपासून दूर जात असतानाच पुराणकथा-इतिहास, लोककला-संस्कृती अशी परंपरा ‘सोंगांची आखाडी’-‘बोहडा’ या माध्यमातून लिंगदेव गावात जपली जात असून गुढीपाडव्याची ‘लिंगेश्वराची’ सोंगांची यात्रा पुरोगामी विचाराची कास धरत संपन्न झाली. जवळपास साडेतीन लाख भाविकांनी यात्रेला हजेरी लावली.दिवसरात्र देणगीच्या ओघामुळे यंदा गुढीपाडव्याला ११ लाख ९५ हजार रुपये लिंगेश्वर संस्थानच्या तिजोरीत जमा झाले आहेत. अभियंता जालिंदर कानवडे यांनी ४१ हजार रुपये, तर भाऊसाहेब घोमल यांनी ३१ हजार रुपये अशी यंदाची सर्वांधिक देणगी दिली. रविवारी पहाटे लिंगेश्वर महादेवाची महापूजा, महाआरती झाल्यावर दर्शनासाठी मंदिरासमोर रांगा लागल्या. रात्रभर दर्शनरांग होती. ऋतूमान उकलविधी, शोभायात्रा, दंडवते, शेरणी वाटप, आदिवासी नृत्य व लेझिम स्पर्धा पार पडल्या. मकडी-डोरेमॉन, बेंटेन, निंज्या-हातोडी, स्पायडरमॅन-पॉवररेंजेस् ही नाव लहान मुलांच्या तोंडातील परवलीचे शब्द होत असून पौराणिक नावे कालबाह्य होताना दिसत आहेत. कथा पुस्तक ग्रंथापुरत्याच सिमित होताना दिसत आहेत.अ शा काळात पुराण-इतिहासातील पात्रे जिवंत ठेवण्याचे काम आखाडी लोककलेतून केले जात आहे. लिंगेश्वर महादेव यात्रेत पुरोगामी विचारांची सांगड घालून डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पोलीस, सैन्यदलातील जवान आदींसह शेतात काबाडकष्ट करणारे असे उच्चशिक्षित व अल्पशिक्षित गावकरी अनादी कालापासून चालत आलेली परंपरा जोपासत आहेत.सनई, डफ, हलगीच्या निनादात... दशावतारातील सोंगाच्या‘संगीत आखाडीने’ रात्र जागविली. सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने काही क्षण हजेरी लावली. पावसातही सोंगांची पावले पावित्र्यावर थिरकली. देणगीच्या रुपाने देवस्थानला ६ लाख १३ हजार रुपये, सोंगाच्या लिलावातून ५ लाख ८२ हजार रुपये असे ११ लाख ९५ हजार रुपये देवस्थानच्या तिजोरीत जमा झाल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्राचार्य डी. बी. फापाळे यांनी सांगितले. राम-रावण, भिम- बकासूर, हिडींब, सत्यवान सावित्री अन् यम आदी ६० हून अधिक पात्रांनी आखाडीत पारंपरिक वाद्यावर पदन्यास केला. सर्वधर्मीय १५० कलाकारांनी यात सहभाग नोंदविला. सोमवारी ४ वाजता कुस्त्यांचा हगामा झाला. लिंगदेवच्या यात्रेने तालुक्यातील याञा हंगामास सुरुवात झाली आहे.
वयाच्या दहा बारा वर्षांपासून मी आखाडी पात्रात नाचतोय. २२ वर्षांपासून मी संगीत आखाडी यात्रेत सहभागी होत असून जवळपास सर्व सोंगे नाचविली आहेत. सध्या नोकरीनिमित्त चिनमध्ये आहे. दरवर्षी पाडव्याला लिंगदेव ठरलेले असते. पुरोगामी विचारांची सांगड घालत आम्ही तरुण ही अनोखी लोककला जपतोय.- अमोल फापाळे, अभियंता