श्रीरामपूर : नगर जिल्ह्याचे भविष्यातील वाढते औद्योगिकीकरण व धार्मिक पर्यटन क्षेत्रातील वाव लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मुंबईकरिता अधिकाधिक रेल्वे गाड्या सुरू कराव्या अशी मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. या मागणीला अनुसरून रेल्वे प्रशासनाने साईनगर- पुणे-दादर एक्सप्रेस सुरू केल्याने या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले.
प्रवासी भवनमध्ये आयोजित केलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रणजित श्रीगोड होते. प्रास्तविक सचिव अनिल कुलकर्णी यांनी केले. आगार प्रमुख राकेश शिवदे, प्रा.गोरख बारहाते, वाहतूक अधीक्षक किरण शिंदे, उद्योजक चेतन भुतडा, दिलीप इंगळे, मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक अंबादास ढोकचौळे, पुरुषोत्तम मुळे, सुरेशचंद्र बाठीया आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पुढील १५ वर्षे मुंबई प्रवासाची गरज लक्षात घेता रेल्वे गाड्यांची आवश्यकता भासणार आहे. रात्री धावणारी व सकाळी मुंबई येथे सोडणारी नागरिकांच्या सोयीची रेल्वे सुरु करण्याची प्रवासी संघटनेची मागणी होती. विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता व विभागीय वाणिज्य प्रबंधक प्रदिप हिरडे यांनी ही सूचना मान्य केली होती. संघटनेच्या मागणीला यश येऊन आठवड्यातून चार दिवस दादर-पुणे- साईनगर व तीन दिवस दादर-पंढरपूर रेल्वेचा मार्ग मोकळा होऊन ११ मार्चपासून रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे श्रीगोड यांनी सांगितले.
बैठकीस अमिता आहेर, सुनील सुतावणे, प्रकाश गदिया, मुळचंद छतवाणी, अरुण बागुल, विजय नगरकर, वासुदेव काळे, दत्तात्रय काशीद, गणेश वाघ, संदीप अग्रवाल आदी उपस्थित होते. प्रवासी संघटनेच्या अजीव सदस्यपदी चेतन भुतडा, दिलीप इंगळे, अरुण बागुल, मुळचंद छतवाणी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
----