अहमदनगर : कोरोना व्हायरसचा प्रसाराला आळा घालण्यासाठी शुक्रवारी (दि.१३) रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिध्दी येथे देश-विदेशातील पर्यटकांना येण्यासाठी ग्रामस्थांतर्फे मज्जाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श गाव हिवरेबाजार येथे येण्यासही पर्यटकांना बंदी घालण्यात आली. तसा निर्णय शनिवारी ग्रामस्थांनी घेतला आहे.संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. नगर शहरातही शुक्रवारी रात्री कोरोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हिवरे बाजारमध्ये दररोज सर्वांगीण ग्रामविकासाची संकल्पना अनुभवण्यासाठी जगभरातून विविध क्षेत्रातील पर्यटक येत असतात. कोरोना रोग संसर्गजन्य असल्यामुळे तो एकाकडून दुसºयाकडे जाण्याचा धोका मोठा आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोरोना आटोक्यात येत नाही तोपर्यंत हिवरे बाजारला भेट देण्याचे पर्यटकांनी टाळावे, असा आग्रह ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे हिवरेबाजार भेटीस पर्यटकांना मज्जाव करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. हिवरेबाजार येथे भेटबंदीचा हा भाग काही काळासाठी असेल. पर्यटकांना प्रेमाचा व खबरदारीचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. त्याचा कृपया कोणीही गैरसमज करून घेवू नये, असे आवाहन हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरसच्या साथीला धैर्याने तोंड देऊन साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
राळेगणसिध्दीपाठोपाठ हिवरेबाजार येथेही पर्यटकांना बंदी; ग्रामस्थांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 12:54 PM