अस्तगाव : सध्याच्या कोरोना आपत्तीमुळे बाहेरील नोकरी मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे सध्या गावातील शिक्षित युवक गावाकडेच छोटा व्यवसाय टाकून रोजगार निर्मितीच्या शोधात असून काही ठिकाणी छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. शिक्षित युवक स्वतःच्या बळावर स्वतःचे जीवन उभे करत असल्यामुळे ग्रामीण भाग आत्मनिर्भरकडे वाटचाल करत असल्याचे सध्या चित्र आहे. गावात व्यवसाय चालू झाल्यामुळे ग्रामपंचायतींचे उत्पन्नदेखील वाढणार आहेत.
सध्या अनेक गावांमध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात गाळे उभे राहून छोटा-छोटा स्थानिक व्यवसाय सुरू केला आहे, तर काही ठिकाणी नवीन गाळ्यांचे काम सुरू आहे. तसेच काही ठिकाणी तर पुढील वर्षांनी कंपनी उभारण्यासाठी जमिनीची मोठ्या भावात खरेदी-विक्री करण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही वर्षापूर्वी लहान-मोठ्या वस्तू खरेदी करण्यासाठी खरेदीदारांना आपले गाव सोडून मोठ्या शहरांमध्ये जावे लागत असे. परंतु सध्याच्या काळात काही प्रमाणात वस्तू ह्या आपल्या गावातच मिळण्यास सुरुवात झाली आहे. गावामध्ये शेती व्यवसाय हा प्रामुख्याने केला जातो, शेती करण्यासाठी बी-बियाणे, औषध, पाईप, पाईप मोटार, कांदा गोण्या, स्प्रिंकलर, इलेक्ट्रिक वस्तू याप्रमाणे आशा काही वस्तू तर कपडे, घर बांधकाम साहित्य, पशुखाद्य गावातच मिळत आहेत.
कोरोना आपत्ती येण्याआधी राहाता तालुक्यातील अस्तगाव, दहेगाव, पिंपळस, कोऱ्हाळे, केलवड, पिंपरी-लोकाई, खडकेवाके, आडगाव ह्या गावांना राहाता नगरपालिकेसमोर भरणाऱ्या आठवडे बाजारात जावे लागत, परंतु सध्या नियमानुसार अनेक गावागावातच बाजार भरतो, तर काही अंशतः घरोघरी भाजीपाला विक्रेते बाजार पुरवत आहे. गावातील शेतकरी आपल्या शेतात पिकलेला भाजीपाला गावातीलच घाऊक व्यापाऱ्यांना विकून गावातच आपला साठा पुरवत असल्याचे चित्र दिसत आहे.
..
घाऊक व्यापार खेडेगावत
गावातील दुकानदारांना पाहिजे असलेला दुकानदारी माल हा शहरातील घाऊक व्यापारी (होलसेल) थेट गावातील दुकानदारांना दुकानात वाहतूक करून टाकत आहे, तर शेतकऱ्याने शेतात पिकवलेला माल खरेदी करण्यासाठी घाऊक व्यापारी थेट शेतात जाऊन मोकळा पडलेल्या मालाची बोली लावून माल खरेदी करत आहेत.
.............
शिक्षण एमबीए झाले आहे. गावात नेमका कोणता व्यवसाय चालू शकतो यासाठी मी अभ्यास केला. यावरून लक्षात आले की शेतकरी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात व गाईंना खाद्य लागते. मग मी गावात गाळा काढून पशुखाद्य होलसेल व्यवसाय सुरू केला, त्यामुळे दूध उत्पादक पशुखाद्य खरेदीसाठी येतात व दोन पैशांचे उत्पन्नदेखील मिळते, त्यासाठी उच्च शिक्षणाची गरज असते.
- सोमनाथ लहामगे, पशुखाद्य विक्रेते, साईकृपा ट्रेडर्स, आडगाव
...........
गावात व्यवसायासाठी अनेक गाळे तयार झाले असून गाळ्यामध्ये विविध स्थानिक व्यवसाय केले जात आहे. गावातील ग्रामस्थांना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची वेळ येत नाही. गावातच ग्रामस्थांना रोजगार निर्माण होत असून त्यामुळे गावाचा मोठा विकास होत आहेत .
- नवनाथ नळे, सरपंच, अस्तगाव......
- पहिला लॉकडाऊन पडल्यानंतर राहाता तालुक्यातील केलवड गावात साई कौशल्या मार्केट म्हणून गाळे उभारण्यात आले आहे.