अहमदनगर : एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत कार्यवाही सुरू केली असून, पर्यायी व्यवस्था म्हणून ३५ स्कूल बस जिल्ह्यात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. गुरूवारी दिवसभर तहसीलदार स्वत: बसस्थानकात ठाण मांडून असून प्रवाशांना मागणीप्रमाणे वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे जिल्ह्यात आपतकालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून, जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार तालुकास्तरावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. बुधवारी व गुरूवारी या समितीने प्रत्यक्ष काम सुरू केले असून, गटविकास अधिका-यांनी शाळांना संपर्क करून स्कूल बस उपलब्ध करण्याचे प्रयत्न केले. त्याप्रमाणे गुरूवारी जिल्ह्यात ३५ बस उपलब्ध झाल्या होत्या. तहसीलदार स्वत: बसस्थानकात ठाण मांडून होते. श्रीरामपूर येथे काही बस उपलब्ध झाल्या, त्यामुळे श्रीरामपूर-राहुरी-नगर अशी वाहतूक सुरू करण्यात आली. राहाता येथेही मोठ्या प्रमाणावर स्कूलबस उपलब्ध झाल्याने प्रवाशांची चांगली सोय झाली.नगर शहरातील माळीवाडा बसस्थानकात तहसीलदार सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १० बस उभ्या करणयात आल्या होत्या. तहसीलदार पाटील स्वत: कंट्रोलरच्या केबिनमध्ये बसून वाहतुकीचे नियोजन करत होते. त्याप्रमाणे नगर-शेवगाव ही तिसगावमर्गे असलेली बस सोडण्यात आली. शेवगाव, पाथर्डी व पुणे येथे जाण्यासाठी मोठी गर्दी होती. त्याप्रमाणे प्रशासन नियोजन करण्याचा प्रयत्न करत होते.
प्रशासनाची दिवाळी बसस्थानकात
एसटी कर्मचा-यांच्या संपामुळे प्रशासनाने आपत्कालीनची घोषणा केली असून त्याप्रमाणे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांची वाहतूक समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती व महसूलचे कर्मचारी गुरूवारी दिवसभर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बसस्थानकावर ठाण मांडून होते. त्यामुळे या अधिकारी-कर्मचाºयांची दिवाळी स्थानकावर गेली. जिल्हाधिकारी अभय महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत.