अहमदनगर : पत्रकार मुरलीधर तांबडे यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी पुन्हा एकदा क्षुल्लक कारणावरून नगर शहरात दोघा पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातील अंबरप्लाझा इमारतीजवळ ही घटना घडली.
या घटनेनंतर पत्रकार बाळकुणाल सांडू अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सय्यद शकील हमीद व सद्दाम शकील सय्यद (दोघे रा. नगर) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात मारहाण तसेच महा. प्रसार माध्यमातील व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्ता नुकसान किंवा हानी प्रतिबंध) अधिनियम २०१७ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी बाळकुणाल अहिरे हे त्यांचे पत्रकार सहकारी सुनील निमसे यांच्यासमवेत कार्यालयातून वार्तांकनासाठी जात असताना त्यांच्या मोटारसायकलला समोरून आलेल्या दोघांनी मोटरसायकलीचा कट मारला. या वेळी अहिरे यांनी चुकीच्या दिशेने वाहन चालवू नका, नियमांचे पालन करा, असे सांगितले. तेव्हा त्या दोघांनी अहिरे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच आणखी चार ते पाच जणांना घटनास्थळी बोलावून घेतले. या वेळी अहिरे यांना काठीने मारहाण केली. या वेळी निमसे हे मध्ये आले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या मारहाणीत अहिरे यांच्या पायाला, डोक्याला, कानाजवळ गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे सय्यद शकील हमीद व सद्दाम शकील सय्यद असल्याचे समोर आले. याबाबत आहिरे यांनी फिर्याद दाखल केली. गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या पथकाने सय्यद शकील हमीद व सद्दाम शकील सय्यद यांना अटक केली. दरम्यान, या घटनेचा अहमदनगर प्रेस क्लब, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, मराठी पत्रकार परिषद यांच्यासह विविध पत्रकार संघटनांनी निषेध करीत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.