अहमदनगर : डॉ. मधुसूदन बोपर्डीकर हे कोणालाही आपलेसे करून घेणारे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी लिहिलेल्या संस्कृतमधील काव्यांच्या खूप आठवणी आहेत. त्या चिरंतन राहतील. त्यांच्याशिवाय नगरचा संगीत व संस्कृतचा इतिहास अपूर्ण आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक डॉ. विकास कशाळकर व संगीतप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
नगर येथील सारडा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांचे १६ मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना शनिवारी ऑनलाईन श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत ते बोलत होते.
श्रुती संगीत निकेतनच्या पुढाकारातून ही सभा घेण्यात आली. संस्थेचे सचिव मकरंद खरवंडीकर व सहसचिव श्री. प्रसाद सुवर्णपाठकी यांनी सभेचे आयोजन केले. या सभेस नगरमधील संगीत क्षेत्रातील मान्यवर, गुरू, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. खरवंडीकर यांनी प्रास्ताविक केले. पवन नाईक, महेश खोपटीकर, वीणा कुलकर्णी, धनंजय खरवंडीकर, कविता खरवंडीकर, डॉ. संगीता पारनेरकर, प्रतिभा धूत, लक्ष्मणराव डहाळे, दीपक शर्मा, विश्वासराव जाधव, निलेश खळीकर, श्रीराम तांबोळी, अनिल बोपर्डीकर यांनी बोपर्डीकर यांच्या आठवणीत सांगत श्रद्धांजली वाहिली.
संगीतज्ञ विश्वासराव जाधव म्हणाले, नगरच्या संस्कृत आणि संगीत या दोन्ही विषयांचा इतिहास हा बोपर्डीकर यांच्याशिवाय अपूर्ण राहील. प्रसाद सुवर्णपाठकी यांनी आभार मानले.