- हेमंत आवारी (अहमदनगर)
माहिती तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली काळभात, हळी व गरी कोळपी, वरंगळ, रायभोग, जिरवेल, ढवळ, आंबेमोहर, मनोहर, हडक्या, तामकुडई हे पारंपरिक भात वाण आता पुन्हा तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात रुजू लागले आहेत. तालुक्यातील एकदरे या आदिवासी खेड्यात हिराबाई व हैबत भादू भांगरे या पती-पत्नीने आपल्या घरात भाताच्या पारंपरिक वाणांची बियाणे बँक तयार केली आहे.
भीमाशंकरपासून त्र्यंबकेश्वरपर्यंतच्या पट्ट्यात २४८, इंद्रायणी, दप्तरी, १००८, आर.२४, पूनम, सोनम, भोगावती हे सुधारित संकरित वाण आल्याने हळूहळू गावरान वाण मागे पडत गेले. काही तर लुप्त होण्याच्या मार्गावरच आहेत. काही स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांतून स्थानिकांना आता पारंपरिक वाणाचे महत्त्व पटू लागले आहे. यामुळे हळूहळू या वाणांचे पुनरुज्जीवन होत आहे. आता कळसूबाई-रतनगडाच्या बंबाळ्या रानात ही गावरान भात पिके पुन्हा डोलताना दिसू लागली आहेत.
बायफ संस्थेच्या माध्यमातून हिराबाई व हैबत भदू भांगरे या पती-पत्नीने आपल्या घरात भाताच्या पारंपरिक वाणांची बियाणे बँक तयार केली आहे. ठिकठिकाणाहून पारंपरिक वाण मिळवले. शेतात या वाणांची लागवड करून ते शास्त्रशुद्ध बियाणे तयार करतात. बायफच्या डॉ. विठ्ठल कौठाळे, संजय पाटील यांच्यासह शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांचे मार्गदर्शन मिळते. बियाणे निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीला प्राधान्यक्रम दिला जात आहे. अमेरिकेतील अनिवासी भारतीय विक्रांत साकळकर व शास्त्रज्ञ देबल देब यांनी ‘हैबत’च्या बियाणे कोषाला भेट दिली. काळभात तांदूळ आपल्याबरोबर नेला. तेथील सर्व कसोट्यांना हा भात उतरला असून, त्यांनी काळभाताची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच काळभात अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे.