अहमदनगर : वाहतूक शाखेचे पोलीस आतापर्यंत फक्त चौकामध्येच थांबलेले असायचे. त्यामुळे ट्रिपल सीट फिरणारे चौकाच्या अलीकडे उतरतात आणि चौक ओलांडला की की पुन्हा दुचाकीवर बसून प्रस्थान करतात. त्याला आळा घालण्यासाठी पोलीस उपअधीक्षक वाय. डी पाटील यांनी वाहतूक पोलिसांचे एक स्वतंत्र फिरते पथक तयार केले आहे. शहरात कुठेही ट्रिपल सीट आढळल्यास दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.वाहतूक शाखेकडून वाहनचालकांवर केलेल्या कारवाईमध्ये सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीटधारकांवर करण्यात आली आहे. ट्रिपलसीट धारकांना फक्त चौकातील पोलिसांचीच भीती असते. दंडाची पावती फाडल्यानंतर पुन्हा तिघेजण दुचाकीवरून बसत नियमांची पार वाट लावतात. पोलिसांना चकवा दिला तरी ट्रिपलसीट चालविणे धोक्याचे आहे. यावर दंड करूनही आळा बसत नसल्याने शहराचे पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी आता वाहतूक शाखेच्या तीन पोलिसांचे एक स्वतंत्र फिरते पथक तयार केले आहे. ते शहरातील मार्गावरून फिरणार असून ट्रिपल सीट दिसताच जागेवरच कारवाई केली जाणार आहे.पोलिसांचे हे पथक कार्यान्वित करण्यात आले असून त्यांना शासकीय दुचाकी देण्यात आली आहे. ते पथक वाहतूक शाखेऐवजी वाय.डी. पाटील यांच्या अधिपत्याखाली काम करणार आहे. शहरातील तरुणांना ट्रिपलसीटच्या धोक्यापासून वाचविणे, तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही,हाच या पथकाचा हेतू असल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाहतूक शाखेचे आता फिरते पथक
By admin | Published: October 03, 2014 11:57 PM