आढळगाव : न्हावरा ते आढळगाव या राष्ट्रीय महामार्गाचे (क्रमांक ५४८ डी) काम सध्या प्रगतीपथावर असून काष्टी ते लिंपणगाव दरम्यान घोड कालव्यावरील पुलाचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. काष्टी, ढोकराई, श्रीगोंदा कारखानामार्गे श्रीगोंदा या पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभागाने केले आहे.
याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अहमदनगर कार्यालयाने निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. काष्टी ते लिंपणगाव दरम्यान घोड कालव्यावरील पुलाचे काम सुरू आहे. त्यातच घोड लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्यामुळे घोडच्या खरिपाचे आवर्तन सोडण्याची मागणी होती. त्यामुळे आवर्तन सोडण्यात आले आहे. येथील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आवर्तनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्यामुळे पुलाचे काम लांबले आहे. त्यामुळे २३ ऑगस्ट ते ३० ऑगस्टपर्यंत काष्टी ते लिंपणगाव मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यावर वळविण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला आहे. काष्टी ते श्रीगोंदा वाहतुकीसाठी ढोकराई, श्रीगोंदा कारखाना मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. याविषयी तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात माहिती दिल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता दिलीप तारडे यांनी सांगितले.