सुपा बस स्थानक चौकातून दररोज जवळपासच्या १५ ते २० गावांतील प्रवाशी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी येतात. त्यामुळे या चौकात हॉटेल्स, फळांचे स्टॉल, रसवंतीगृह यांचीही रेलचेल असते. ग्राहकांची मोठी गर्दी असते, परंतु लॉकडाउन जाहीर होताच हे सर्व बंद झाले. शनिवारी बस स्थानकात एकही प्रवासी नव्हता. वाहतूक नियंत्रक वगळता बस स्थानक रिकामेच होते. सुप्यातील आठवडे बाजार बंद असला, तरी दररोज बाजारतळावर बाजार भरत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री व्हायची. रात्री उशिरापर्यंत बाजारतळावर गर्दी दिसायची. ती आता बंद झाली आहे. बाजार बंद झाल्याने फळे, भाजीपाला, फळभाज्यांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सुपा बस स्थानक चौकात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे, अमोल धामणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची नाकेबंदी झाली आहे. याच चौकात सुपा परिसरातील गावातून लोक येत असतात, तेथे आणलेल्या बंदोबस्त व होणाऱ्या पोलीस कारवाईचा नागरिकांनी धसका घेतल्याचे जाणवले.
सुपा ग्रामपंचायतीचे ग्रामविस्तार अधिकारी अशोक नागवडे, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी दुकाने बंद करण्याबाबत सूचना दिल्या. गर्दीच्या ठिकाणांपैकी बस स्थानक चौक, बेकरी पॉइंट, बाजारतळ, सुपा हाइट, बँक रोड, जुना वाघुंडे चौक, शहजापूर चौक या ठिकाणी शुकशुकाट होता.
.............
१० सुपा
‘ब्रेक द चेन’अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नगर-पुणे रोड, सुपा बस स्थानक चौकात शुकशुकाट दिसत होता.