शिर्डी : शिर्डीत नेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस संजय शिंदे (वय ४०, रा. राजुरी, ता. राहाता) दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. त्यांच्या वृद्ध आईवर मुलास शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तपास सुरू असल्याचे नेहमी इतरांना देण्यात येणारे उत्तर या वृद्ध आईलाही मिळत आहे.गेल्या २० डिसेंबरला ते ड्युटीवर चाललो म्हणून घरातून निघाले. संजय घरी न आल्याने आईने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. २४ डिसेंबरला पोलीस ठाण्यातूनच संजयला ड्युटीवर पाठवा, असा निरोप आल्यानंतर तो बेपत्ता असल्याचा उलगडा झाला. यानंतर त्यांच्या आईने धावतपळत जाऊन शिर्डीत पोलीस ठाण्यात मुलगा हरवल्याची तक्रार दिली.‘माझा पोलीस लेक दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे. कुणी पाहिलंय का माझ्या लेकाला? कुणीतरी त्याला शोधून आणा रे!’ अशी विनवणी करीत संजयची आई पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवित आहे़ आपला मुलगा पोलीस होता. त्यामुळे पोलीस त्याला नक्की हुडकून काढतील, या आशेवर ती त्याची वाट पहात आहे. संजय यांची पत्नी धुळे पोलिसात असून, दोघांचे न्यायालयात वाद सुरू असल्याचे समजते.
संजय शिंदे यांचा शोध सुरू आहे़ त्यांनी एकदा बु-हाणपूर व एकदा भुवनेश्वर येथे एटीएममधून पैसे काढले आहेत. दोन्हीही ठिकाणे रेल्वे स्थानकालगतची आहेत. खात्यात बरेच पैसे असतानाही थोडे थोडे काढण्यात येत आहेत. यावरून ते सुरक्षित असावेत़ मात्र त्यांनी घरी संपर्क केलेला नाही. त्यांनी मोबाईल बंद केलेला आहे. मात्र आयएमईआय क्रमांकावरून दुसरा एखादा नवीन क्रमांक सुरू केला काय? याचा शोध घेण्यात येत आहे. तसे झाले तर त्यांचे ठिकाण मिळून शोध घेण्यास मदत होईल.-संदीप दहिफळे, फौजदार तथा तपासी अधिकारी, शिर्डी.