लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : महाराष्ट्रातील सुमारे अडीच ते तीन हजार महिलांची ओमान आणि दुबई या देशात मानवी तस्करी झालेली आहे. त्या महिलांची सोडवणूक करण्यासाठी महिला आयोगाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिली.
‘राज्य महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमातून मंगळवारी चाकणकर यांनी नगरमध्ये येऊन महिलांच्या तक्रारी जाणून घेतल्या. त्यावर जनसुनावणी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, राज्यातील महिलांना परदेशात काम देतो असे सांगून नेले जाते. यासाठी काही एजंट कार्यरत आहेत. परदेशात गेल्यावर या महिलांकडून त्यांची कागदपत्रे, फोन काढून घेतले जातात आणि त्यांचा छळ करीत डांबून ठेवले जाते. असाच एक व्हिडीओ ओमान या देशात फसवून नेलेल्या महिलेचा आला होता. या व्हिडीओवरून मुंबईत ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी महिला आयोगाने पत्रव्यवहार केला आहे. पुढील ५ ते ६ महिन्यांत सर्व महिलांची सुटका केली जाईल, असेही त्या म्हणाल्या.
गौतमी पाटीलच्या व्हिडीओप्रकरणी लवकरच कारवाईनृत्यांगना गौतमी पाटील हिचा चेंजिंग रूममधील व्हिडीओ व्हायरल झाल्या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत सायबर सेलच्या पोलिस अधीक्षकांना महिला आयोगाच्या वतीने पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. निश्चितच कारवाई केली जाईल, असे चाकणकर म्हणाल्या.