चांडगाव येथील घटना: दहा जण जखमी; एकाची प्रकृती चिंताजनक
श्रीगोंदा(अहमदनगर) : तालुक्यातील चांडगाव येथे तमाशात नाचण्यावरुन जोरदार दगडफेक करण्याची घटना घडली असून, यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत़ या दगडफेकीनंतर दोन गटात धुमश्चक्री झाली़ ही घटना रविवारी रात्री घडली़ श्रीगोंदा तालक्यातील चांडगावचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रौत्सवानिमित्त गावात तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ तमाशात शांताबाई हे गाणे सुरू झाले़ या गाण्याच्या तालावर ठेका धरीत तरुणाईने जल्लोष सुरु केला़ त्याचवेळी पाठीमागून जोरदार दगडफेक सुरु झाली़ तमाशा कलावंत जीव मुठीत धरुन ट्रकखाली तर कुणी कनातीच्या आड लपले़ या दगडफेकीतून सतीश गोरख म्हस्के व किरण म्हस्के यांच्या गटात जोरदार धुमश्चक्री रंगली़ हे पाहून ग्रामस्थांनी तेथून पळ काढला़ या तुफान हाणामारीत दहा जण जखमी झाले, तर तिघांची प्रकृती गंभीर आहे़ पंढरीनाथ म्हस्के, सतीश म्हस्के, गजेंद्र म्हस्के हे तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नगर व श्रीगोंदा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ पंढरीनाथ म्हस्के यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते़ सतीश म्हस्के व किरण म्हस्के यांनी एकमेकांच्या विरोधात फिर्यादी दिल्या असून, श्रीगोंदा पोलिसांनी दोन्ही गटाच्या विरोधात दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे़ पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांनी घटनास्थळास भेट देऊन शांततेचे आवाहन केले़ ...