अहमदनगर : आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांचा तिढा वाढला आहे. ३० सप्टेंबर नंतर होणाऱ्या पटसंख्या निश्चितीनंतर जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता प्राथमिक शिक्षण विभागाने व्यक्त केली. यामुळे महिनाभराने शिक्षक अतिरिक्त होणार असल्याने आता अतिरिक्त शिक्षकांना का जिल्ह्यात समावून घेता, या विषयी शिक्षण विभागात खल सुरू आहे. दरम्यान, शनिवारी दुपारी आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची भेट घेत हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली आहे.जिल्हा परिषदेत गेल्या सहा महिन्यांपासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीचा विषय गाजत आहे. सुरूवातीला शिक्षकांपूर्ता मर्यादीत राहिलेल्या या विषयात आता सामाजिक संघटनांनी उडी घेतली आहे. काहींना जिल्ह्यात पदोन्नती आणि समायोजनाने रिक्त होणाऱ्या जागा सरळसेवेने भराव्यात, तर काही जिल्हा परिषद सदस्यांना आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांना समावून घेण्याचा आग्रह आहे. शिक्षकांच्या बदलीच्या कायद्यानुसार जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या जागा या एकतर सरळसेवा भरतीने अथवा आंतरजिल्हा बदली यापैकी कोणत्याही एका पर्यायाने भरण्याचे निर्देश आहेत. मात्र, यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकरण म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अधिकार देण्यात आलेले आहेत. सुमारे २० दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत रिक्त जागांवर प्राधान्याने आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आंतरजिल्हा बदलीच्या नावाने जिल्हा परिषदेत बऱ्याच घडामोडी सुरू असल्याची चर्चा शिक्षण विभागात सुरू आहे. यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी यांनी देखील प्रकरणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष लंघे, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे आणि काही सदस्यांची जिल्हा परिषदेत या विषयांवर बैठक झाली. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेतली. त्यानंतर लवकर याबाबत अंतिम धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.आंतरजिल्हा शिक्षकांचे शिष्टमंडळ लंघे यांना भेटले असून त्यांनी तातडीने हा विषय संपविण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)३० सप्टेंबर नंतर पटसंख्या निश्चित झाल्यानंतर जिल्ह्यात सुमारे २५० शिक्षक अतिरिक्त होण्याची भिती आहे. यामुळे आत्ताच आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांना जिल्ह्यात सामावून घेतल्यास महिनाभरानंतर गुणवत्ताधारक शिक्षकांना जिल्ह्याबाहेर जाण्याची भीती शिक्षण विभागातून व्यक्त होत आहे.
आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदलीचा तिढा वाढला
By admin | Published: August 30, 2014 11:10 PM