पारनेरच्या तहसीलदार देवरे यांच्या अनागोंदी व मनमानी कारभारामुळे तहसील कार्यालय कर्मचारी आणि तलाठी यांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत असून त्यांची बदली करण्यासाठी तीन दिवसांपासून तलाठी संघाने अध्यक्ष संतोष मांडगे व तहसील कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र रोकडे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी तिसऱ्या दिवशी नगर जिल्हा महसूल कर्मचारी व तलाठी संघटना यांची बैठक होऊन पारनेरमधील तलाठी व कर्मचारी आंदोलनास पाठिंबा देण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब डंमाळे, तलाठी संघटना जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव भुजबळ, विजय धोत्रे, तालुकाध्यक्ष संतोष मांडगे, अक्षय फलके, महेंद्र रोकडे, पंकज जगदाळे, सुरेश जेथे, रावसाहेब निमसे, कैलास साळुंखे, संतोष तनपुरे, सचिन औटी, कैलास खाडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
-------
तलाठी व महसूल कर्मचारी यांच्या आंदोलनाचे निवेदन मला मिळाले नाही. आमचे काम सुरूच राहणार असून सामान्य लोकांची गैरसोय होऊ देणार नाही.
- ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर