घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील एका वाईन शॉपीमधून मद्याच्या बाटल्या घेऊन चारचाकी वाहनातून या बाटल्यांची अवैधरित्या वाहतूक करणा-या दोघांना पोलिसांच्या पथकाने पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व मद्य असा एकूण ६ लाख ५३ हजार १०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुरूवारी रात्री आठच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर हॉटेल साई मल्हारसमोर करण्यात आली. मुश्ताक इमाम सय्यद (वय ३४, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर), संजय नाथा वाघ (वय ३८, रा. पत्र्याची वाडी, अकलापूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल किशोर सुधीर लाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. मुश्ताक सय्यद व संजय वाघ या दोघांनी गुरूवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास घारगाव येथील हेरिटेज वाईन शॉपी येथून ५३ हजार १०४ रूपयांच्या मद्याच्या बाटल्या विक त घेतल्या. या बाटल्या बोलेरा (एम. एच. १७, बी. एस. १३३७) या चारचाकी वाहनातून घेऊन हे दोघे जात होते. दरम्यान नाशिक -पुणे महामार्गावरील हॉटेल साई मल्हारसमोर थांबले असता पोलिसांनी केलेल्या तपासणीत या वाहनात मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत मुद्देमाल हस्तगत केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी दुपारनंतर जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद करण्यात आली आहेत. असे असताना मात्र, हेरिटेज वाईन शॉपीमधून मद्याची विक्री सुरू होती. या प्रकरणाचा तपास पोलीस कॉन्स्टेबल रघुनाथ खेडकर करीत आहेत.
चारचाकी वाहनातून मद्याची वाहतूक; साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 5:58 PM