नेवासा : तालुक्यातील प्रवरासंगम हद्दीतील गोधेगाव-सिद्धेश्वर मंदिरा दरम्यान मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास बेकायदा जनावरांची वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली. यामध्ये सहा जनावरांसह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून समीर अब्दुल रहीम कुरेशी (वय-२४ रा.सिल्लेखाना पैठणगेट, औरंगाबाद) याच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास गोधेगाव कडून सिद्धेश्वर मंदिर मार्गे औरंगाबादकडे पिकअप (एम.एच -२० डीई- ७०४१) यातून कत्तल करण्यासाठी गोवंश जनावरांची वाहतूक करणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांना मिळाली. त्यानंतर कैलास साळवे, बाळकृष्ण गलधर यांनी गोधेगाव-सिद्धेश्वर मंदिरा रस्त्यावरील डावखर वस्तीजवळ सापळा लावला. साडेदहाच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिराच्या दिशेने येणारी पिकअप येताना दिसली. पोलिसांनी पिकअप अडवून गाडी बाजूला घ्यायला सांगितले. चालक समीर अब्दुल रहीम कुरेशी याने पिकअप बाजूला घेतले. आत मध्ये तीन गाया व तीन लहान बैल दोरीने बांधून दाटीवाटीने भरून वाहतूक चालू होती. पोलीसांनी सहा जनावरांसह एक पिकअप गाडी असा पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. समीर अब्दुल रहीम कुरेशी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस नाईक राहुल यादव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डॉ.शरद गोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गौतम वावळे करीत आहेत.