कर्जत : गेल्या सहा वर्षांपासून चार चाकी गाडी नाही म्हणून कर्जतचे तहसीलदार दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. जीव धोक्यात घालून वाळू तस्करांवर कारवाई करीत आहेत. शासनाने महसूलाचे दिलेले उद्दीष्ट पूर्ण करीत आहेत. गाडीचा प्रस्ताव शासन दरबारी पडून असून नव्या वाहनाच्या प्रतीक्षेत कर्जतचे तहसीलदार व तहसील कार्यालयातील कर्मचारी आहेत.कर्जत तहसील कार्यालयास नवीन प्रशस्त इमारत मिळाली. यामुळे कर्जत तालुक्यातील जनतेची मोठी सोय झाली. एका छताखाली सर्व कामे होऊ लागली. मात्र कर्जत येथील तहसीलदार कार्यालयाला गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. पूर्वीची कालबाह्य झालेली गाडी शेडमध्ये लाऊन ठेवली आहे. यामुळे या गाडीवर खूप मोठ्या प्रमाणात धूळ साठली आहे. प्रत्येक तालुक्याचे तहसीलदार हे तेथील सर्वेसर्वा असतात, अशा जबाबदार अधिकाºयांना गेल्या सहा वर्षांपासून चारचाकी वाहन नाही. यामुळे ते दुचाकीवरून प्रवास करीत आहेत. काही वेळेस खासगी भाडोत्री वाहन वापरत आहेत. तर कधी इतर शासकीय वाहनातून प्रवास करीत आहेत. कर्जत तालुक्यातील एका टोकाला भिमा नदी आहे तर दुसरीकडे सीना नदी आहे. या दोन्ही ठिकाणी वाळूतस्कर बेकायदेशीर वाळू उपसा करीत आहेत. याठिकाणी कारवाई करताना तहसीलदार व महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची मोठी कसरत होते. वाळूतस्कर अत्याधुनिक गाड्यावर असतात. तर कर्जतचे तहसीलदार भाडोत्री वाहनात असतात. त्यांना कसलीच सुरक्षीतता नसते. अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून वाळूतस्करी करणाºयांवर कारवाई करतात. विशेष बाब म्हणजे प्रत्येक वर्षी महसूल विभागाच्या अधिकाºयांनी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा जादा महसूल शासनाला जमा करून देत आहेत.गेल्या वर्षी कर्जत तालुका महसूल वसुलीत अहमदनगर जिल्ह्यात दुसरा आला होता. मात्र कर्जत तहसील कार्यालयास चार चाकी गाडी नाही ही मोठी शोकांतिका आहे. कोट्यवधी रूपयांचा महसूल शासनाकडे जमा केला, मात्र काही लाख रुपये किमतीची गाडी मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे. वाळू तस्कर अनेक ठिकाणी कारवाई करण्यासाठी येणा-या पथकावर हल्ले करतात अशी घटना अद्याप कर्जत तालुक्यात घडली नाही. दुर्दैवाने घडलीच तर याला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न आहे. चारचाकी नसल्याने अनेक वेळा अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल खचते. याशिवाय इतर कामांसाठी तालुक्यातील विविध ठिकाणी फिरताना त्यांना मर्यादा पडत आहेत. कर्जतचे न्याय दंडाधिकारीच न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कोण व कधी न्याय मिळवून देतील याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमच्या कार्यालयाला गाडी नाही. याबाबतचा प्रस्ताव २०१२ मध्येच वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. आम्ही आमची कामे पूर्ण करीत आहोत. कर्जत तहसीलदारांना चारचाकी वाहन कधी द्यायचे याचा निर्णय वरिष्ठ घेतील. याबद्दल आम्ही काही बोलणार नाही.-किरण सावंत पाटील, तहसीलदार, कर्जत.