संगमनेर : चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली. या अपघातात ट्रॅव्हलचा क्लिनर आणि ट्रॅव्हलमधून प्रवास करणारे चार प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून हा अपघात शुक्रवारी (दि. ०३) सकाळी सहाच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर संगमनेर तालुक्यात सायखिंडी शिवारात घडला.
शंकर त्र्यंबक श्रीराम (वय २५, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) असे या अपघातातील जखमी क्लिनरचे नाव आहे. एम.एच. ०४, जी.पी. ७८६५ या क्रमाकांची ट्रॅव्हल बोरीवलीहून (मुंबई) संगमनेर मार्गे शिर्डीला निघाली होती. चालक शिवदास आव्हाड यांचे ट्रॅव्हलवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गावरून खाली उतरून ट्रॅव्हल खड्ड्यात जाऊन उलटली. अपघाताची माहिती मिळताच डोळासणे येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख, पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे हे वाहनचालक, पोलीस हेड कॉस्टेबल अरविंद गिरी, उमेश गव्हाणे, नंदकुमार बर्डे, योगिराज सोनवणे यांच्यासह तत्काळ अपघातस्थळी पोहोचले.
हिवरगाव पावसा येथील टोल नाक्याच्या रुग्णवाहिकेतून जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. क्लिनर शंकर श्रीराम यांच्यावर उपचार सुरू आहेत. ट्रॅव्हलमधून दहा ते बारा प्रवासी प्रवास करीत असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या इतर चार जणांची नावे समजू शकली नाहीत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दुपारपर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद नसल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले.