अरुण वाघमोडे, लोकमत न्यूज नेटवर्क, अहमदनगर: अर्ध्या तिकिटात एसटी प्रवास या राज्य सरकारच्या योजनेचा महिला मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागात गेल्या सात दिवसांत २ लाख ६६ हजार २८९ महिलांनी एसटीचा प्रवास केल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले. राज्य सरकारने सर्व महिलांसाठी महिला सन्मान योजना सुरू केली असून या अंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे.
नगर विभागात ही योजना १७ मार्चपासून सुरू करण्यात आली. १७ ते २३ मार्चपर्यंत २ लाख ६६ हजार २८९ महिलांनी एसटीतून प्रवास केला. प्रवास केलेल्या महिलांच्या संख्येनुसार महामंडळाच्या नगर विभागाला शासनाकडून सवलतीच्या परिपूर्तीपोटी ८२ लाख ६७ हजार ९२८ रुपये मिळणार आहेत. दरम्यान,७५ वर्षांवरील महिलांसाठी अमृतज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत मोफत प्रवास आहे.