गोरख देवकरअहमदनगर : येथील विद्यार्थ्यांना ‘आयटीआय’सह उच्च शिक्षणासाठी नगर, पुण्याला जावे लागते. ही शरमेची बाब असून याचा विचार सर्वच लोकप्रतिनिधींनी करायला हवा, अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. तर सतत पडणाऱ्या दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यात शासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केल्या.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधीने सोमवारी (दि.८) नगर-शेवगाव (व्हाया तिसगाव) एसटी बसमधील प्रवाशांशी संवाद साधला.प्रवासाच्या सुरुवातीपासूनच पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील दुष्काळाचे वास्तव खिडकीतून सहज बाहेर डोकावले तरी जाणवत होते. रस्त्याच्या दुतर्फा नजर जाईल तिथपर्यंत उघडे बोडके डोंगर, कोरडे पडलेले ओढे, नाले, नांगरट केलेली शेते, असे चित्र दिसत होते. त्यामुळे दुष्काळाबाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असतील असा अंदाज होताच. अगदी तसेच झाले. ठराविक कालावधीत पडणारा दुष्काळ आता दर दोन वर्षांनी पडत आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी त्यादृष्टीने काही तरी उपाययोजना करणे गरजेचे आहे. एकेकाळी कापसाचे आगार असलेल्या तालुक्याची आजचीही स्थिती काय? येथील जिनिंग का बंद पडतायत? यावर चर्चा होईल का? याबाबत कोणी काहीच बोलत नाही? असा संताप यावेळी शेवगाव येथील शेतकरी शंकर बडे यांनी व्यक्त केला.जायकवाडीत हजारो शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी गेल्या. अनेक गावे स्थलांतरीत झाली. मात्र पाणी वाटपाबाबत कायम दुजाभाव केला जातो. याशिवाय मुळा धरणाच्या ‘टेल’च्या भागात तालुक्यातील गावे येतात. या गावांना आवर्तनाचे पाणी मिळताना कायमच संघर्ष करावा लागतो, अशी खंत शेवगाव येथील राहुल घुले यांनी व्यक्त केली.कोणतेही सरकार आले तरी आमच्या आई-बापाला ऊसतोडणीला जावेच लागते. त्यांच्या दिनक्रमात काहीच बदल झालेला नाही. अमूक एक सरकार आले म्हणून त्यांना काही फायदा झाला, असे कधीच झाले नाही. मी आज २४ वर्षांचा आहे. दरवर्षी त्यांना ऊसतोडणीसाठी परजिल्ह्यात जावेच लागते. त्यामुळे कधीकधी असे वाटते की काहीच होणार नसेल, तर निवडणुका होतातच कशाला? अशी उद्विगनता राहुल हुलमुखे या नगर येथे उच्च शिक्षण घेत असलेल्या युवकाने व्यक्त केली.आम्ही मोदींनाच मतदान करतो!पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, माझ्याकडे पाहून मतदान करा. गेल्यावेळीही त्यांच्याकडे पाहूनच मतदान केले. त्यानंतर मागील पाच वर्षात आमच्या भागात किती विकासकामे झाली? असा उपरोधिक सवाल एका प्रवाशाने केला.प्रचारातून स्थानिक मुद्देच गायब!सध्या सुरू असलेल्या प्रचार सभांमध्ये सत्ताधारी अथवा विरोधक कोणीही त्या त्या भागातील स्थानिक मुद्यांवर बोलायला तयार नाही. एकमेकांची उणीदुणी आणि राष्टÑीय मुद्यांभोवतीच प्रचार सुरू आहे. त्यातून केवळ लोकांचे मनोरंजन होते. मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. नेत्यांनी स्थानिकांसाठी काय करणार? यावर भाष्य करायला हवे, अशी अपेक्षा बोधेगाव परिसरातील शरद काकडे यांनी व्यक्त केली.