अहमदनगर : महापालिका क्षेत्रात ६५, तर जिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात ८ असे जिल्ह्यात एकूण ७३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. जे उपचारासाठी दाखल झाले होते, त्यातील महापालिका क्षेत्रात एका रुग्णाचा, तर जिल्हा रुग्णालय कार्यक्षेत्रात २ अशा एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७० जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. सध्या या आजारावरील औषधी, इंजेक्शन उपलब्ध नसल्याचेही आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७३ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. यातील काही रुग्णांवर तातडीचे उपचार व्हावेत, तसेच आजारावरील इंजेक्शन उपलब्ध व्हावेत, यासाठी काही रुग्णांनी थेट नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद जिल्ह्यात धाव घेतली आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराची लक्षणे आढळून येत आहेत. या आजारावरील उपचाराचा खर्च काही लाखांच्या घरात आहे. आरोग्यमंत्र्यांनी म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याचा आदेश मंगळवारी काढला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४२ रुग्णालयांत मोफत उपचाराची सोय आहे. यापैकी जिल्ह्यातील आठ रुग्णालयांत म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करण्यात येत असून, नाक, कान, घसा, डोळे यासारख्या ११ अवयवयांचे पॅकेज रुग्णालयांना देण्यात आले आहे. त्यानुसार खाजगी रुग्णांलयात उपचार केले जाणार असून, त्याबदल्यात खासगी रुग्णांलयांना शासनाकडून उपचाराची रक्कम अदा केली जाणार आहे.
.......
या रुग्णालयांत उपचाराची सोय
जिल्हा रुग्णालय, नोबेल, आनंदरुषीजी, साईदीप, विळद घाट येथील विखे पाटील मेमोरीयल हॉस्पिटल, कोपरगाव आणि शिर्डी येथील रुग्णालयांत म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराची सोय आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजेनेत अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांत दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे कर्मचारी दिवसभर रुग्णालयात असतात. रुग्णालय व्यवस्थापनाबाबत काही तक्रार असल्यास या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
...
शासनाने महात्मा फुले जनआरोगय योजनेत म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश केला आहे. तसा आदेश आजच प्राप्त झाला असून, या योजनेंतर्गत आठ रुग्णालयांत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
-डॉ. वासिम शेख, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना
------------------